Pune News | महापालिकेसाठी नवं ‘सुरक्षा दल’ सज्ज ; क्युआरटीची पहिली तुकडी उद्यापासून सक्रिय

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले, आंदोलने व महापालिकेच्या मिळकतींवर घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिकेकडून शीघ्र कृती दल (क्युआरटी) स्थापन करण्यात आले आहे. या क्युआरटी पथकातील दहा जणांची पहिली तुकडी उद्या (सोमवार) पासून मुख्य इमारतीच्या सुरक्षिततेसाठी सेवेत रुजू होणार आहे. काही दिवसांपूर्वी आयुक्त कार्यालयात झालेल्या गोंधळानंतर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण, आकाशचिन्ह व बांधकाम विभागांच्या कारवाईवेळी अधिकारी- कर्मचाऱ्यांवर वारंवार जीवघेणे हल्ले होतात. त्याचबरोबर परिमंडळ व क्षेत्रीय कार्यालयांवर आंदोलने, मोर्चे निघतात. महापालिकेच्या मिळकतींच्या ठिकाणीही अनेक गैरप्रकार घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा विभागाला क्युआरटीची जोड देण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या १२०० सुरक्षा कर्मचारी आहेत.
त्यापैकी ५० कर्मचाऱ्यांची क्युआरटीसाठी निवड करण्यात आली असून, प्रशिक्षित दहा कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी १ सप्टेंबरपासून कार्यरत होईल. पुढील टप्प्यात महापालिकेच्या पाच परिमंडळांत प्रत्येकी पाच जणांचे क्युआरटी पथक नियुक्त केले जाईल. अतिक्रमण, आकाशचिन्ह विभाग, १५ क्षेत्रीय कार्यालये, वाहन विभाग, कचरा डेपो, उद्याने, पाण्याच्या टाक्या अशा ठिकाणीही या पथकांची नेमणूक होणार आहे.
याबाबत सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले, की महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी क्युआरटी तयार करण्यात आले आहे. पहिली तुकडी १ सप्टेंबरपासून सेवेत रूजू होत असून, सुरुवात मुख्य इमारतीपासून केली जाणार आहे. त्यानंतर परिमंडळ व क्षेत्रीय कार्यालयांनाही सुरक्षा दिली जाईल.





