Pune News : महापालिकेचा खर्च वाचणार! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मुळा- मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी संरक्षण खाते, महिला व बालकल्याण विकास विभाग, बॉटनिकल गार्डन आणि वन विभागाच्या ताब्यातील तब्बल २२.२६ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या जागेचा मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेकडे ११६ कोटी निधीची मागणी केली होती. मात्र, या प्रकल्पासाठी आता नाममात्र दराने ही जागा मिळण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुळा-मुठा नदीकाठ विकसन प्रकल्पाची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत महापालिकेने हा मोबदला शासनाने देण्याची मागणी केली. या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाॅररूममधील प्राधान्य प्रकल्प आहे. त्यामुळे ही जागा नाममात्र दराने देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेस मोठा दिलासा मिळणार आहे. या बैठकीस महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
मुळा- मुठा नदीच्या सुमारे ४४.४ किलोमीटर लांबीवर सुशोभीकरणाचे काम सुरू असून, त्यात विविध विभागांच्या जागांचे भूसंपादन केले जाणार आहे. यामध्ये महिला व बालकल्याण विकास विभागाची मुंढवा सर्व्हे नंबर ९३ येथील ०.७७ हेक्टर, बॉटनिकल गार्डनची मुंढवा सर्व्हे नंबर ८८ येथील ३.४ हेक्टर आणि वनविभागाची कोरेगाव पार्क सर्व्हे नंबर ३० व ३९ येथील ११ हेक्टर जागांचा समावेश आहे.
संरक्षण खात्याने संगमवाडी येथील ७ हेक्टर जागेवर कामाला परवानगी दिल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या जागेच्या बदल्यात महापालिका संरक्षण विभागाला ३२ कोटींची कामे करून देणार असून, ही कामे संरक्षण विभागाने दर्शविलेल्या ठिकाणी केली जाणार आहेत. येत्या आठवड्यात महापालिका व संरक्षण खाते यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार होणार आहे.
एकतानगरीलाही निधी देणार..
या बैठकीत महापालिकेकडून एकतानगरी परिसरासाठीही नदीकाठ विकसन प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी ३०० कोटींच्या निधीची मागणी आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी आपत्ती व्यवस्थापनाचा किती निधी शासनाकडे शिल्लक आहे, याचा आढावा घेऊन निधी उपलब्ध असल्यास तो तातडीने मंजूर करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना स्पष्ट केले, तसेच नदीकाठ विकसन प्रकल्पाची गती वाढविण्याच्या सूचनाही केल्या.





