Pune News : आपले आशीर्वाद असू द्या.! शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांची हडपसरकरांना भावनिक साद

– विवेकानंद काटमोरे
हडपसर : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्तेही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अशातच हडपसर विधानसभा मतदार संघातील शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी सोशल मीडियावर पत्र व्हायरल करून तुमच्या नानाला आशीर्वाद द्या, अशी भावनिक साद हडपसरकरांना घातली आहे.
या पत्रकामुळे आगामी विधानसभेसाठी त्यांनी महायुतीकडून हडपसर विधानसभेत आपल्याला उमेदवारी मिळावी, असाच सुर अळवल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात त्यांनी गेल्या २० वर्षापासून समाजकारण व राजकारणात सक्रियपणे कार्यरत आहे. आत्तापर्यंत केलेल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून करीत असलेली कामे आपल्यापर्यंत पोहोचवतांना मनात समाधानाची व कृतज्ञतेची भावना आहे.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त आणि फक्त आपल्या प्रेमामुळे व कुटुंबातील समाजकारणाच्या शिकवणीमुळे मी मतदार संघात राजकारण व समाजकारणाचा पिंड जोपासू शकलो. हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटींचा निधी उपलब्ध करून विकास कामे करत असल्याचा दावाही भानगिरे यांनी केला आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान , विरंगुळा केंद्र, भाजी मंडई, नागरिकांना मोफत सेवा देणाऱ्या दशरथ बळीबा भानगिरे रुग्णालयाची निर्मिती ,अशा विविध माध्यमातून विकासाचे नवे केंद्र हडपसर मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असल्याचे म्हणणे ते या पत्रकातून मांडत आहेततुमच्या नानाला आशीर्वाद द्या …,मतदार संघाचा चेहरामोहरा पालटून टाकल्याशिवाय थांबणार नाही.
यावेळी हा आशीर्वाद द्यायला आपण कमी पडणार नाही ,अशी आशा बाळगतो असं आवाहन प्रमोदनाना भानगिरे यांनी या पत्रकाच्या माध्यमातून समस्त हडपसरकरांना केले आहे.येऊ घातलेली विधानसभा ही महायुती एकत्रितपणे लढण्यासाठी सज्ज आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट ,भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही राजकीय पक्षाकडून अनेकांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.
या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार योगेश टिळेकर यांची भारतीय जनता पार्टीकडून नुकतीच विधान परिषद सदस्यपदी वर्णी लागली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील हेही मतदार संघात महायुतीकडून प्रबळ दावेदार आहेत.
त्यातच शिवसेनेचे शिंदे गटाचे शहर प्रमुख असलेले नाना भानगिरे यांनीही महायुतीकडून उमेदवारीची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीकडेही तुल्यबळ अशा इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे महायुतीकडून नेमक्या कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार ? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
मतदार संघाचा चेहरामोहरा बदलणार
राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनता दरबार च्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशी आहे. याशिवाय मुख्यमंत्री बैलगाडा शर्यत, राज्यस्तरीय सेना केसरी स्पर्धा, प्रभू श्रीरामांचे पुर्णाकृती शिल्प, सर्वात मोठी धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी असे उपक्रम राबविले जात असतानाच सामाजिक बांधिलकी जपत आजवर हजारो महिला, ज्येष्ठ नागरिक, गरजू विद्यार्थी, कामगार यांना हवी ती मदत स्वखर्चातून केली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचा यापुढे चेहरा मोहरा बदलण्यासाठी मला मतदारांनी आपले आशीर्वाद द्यावे.
प्रमोद भानगिरे (शहरप्रमुख – शिवसेना पुणे शहर / शिंदे गट)




