Pune News : मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचा पूरग्रस्तांसाठी पुढाकार; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला 51 लाखांचा धनादेश

पुणे : मराठवाडासह अन्य विभागात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी असोसिएशनने सामाजिक दायित्व जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५१ लाख ५१ हजार रुपये इतके योगदान दिले आहे. या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द केला आहे.
यावेळी मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन देशपांडे, आमदार हेमंत रासने, प्रमोद पाटील, निहार आडकर, प्रविण घाडगे, गजेंद्र पवार, केदार साबणे, श्रीनिवास बडवे, मकरंद केळकर, अद्वैत परुळेकर आदी बांधकाम व्यावसायिकांसह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन ही राज्यातील बांधकाम क्षेत्रातील एक प्रमुख संस्था आहे. मराठवाड्यामध्ये झालेल्या भीषण पर्जन्यामुळे हजारो नागरिक बाधित झाले आहेत. पूर आणि अतिवृष्टीमुळे मालमत्ता, शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आणि आर्थिक नुकसानीची ही व्याप्ती लक्षात घेऊन, पीडित बांधवांच्या पुनर्वसनासाठी आणि तातडीच्या मदतीसाठी मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.
याविषयी असोसिएशनचे अध्यक्ष देशपांडे म्हणाले, या आपत्तीमुळे झालेल्या अपार नुकसानाची आम्हाला जाणीव आहे. पीडित नागरिकांच्या साहाय्यार्थ सामाजिक दायित्वातून आम्ही राज्य शासनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहोत. मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा केली आहे. आमचे हे योगदान म्हणजे, राज्य शासनाच्या या संकटावर मात करण्याच्या भगीरथ प्रयत्नांत आमचा एक खारीचा वाटा आहे. हे योगदान पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने मिळणाऱ्या मदतीत आणि दीर्घकालीन पुनर्वसन कार्यात निश्चितच उपयोगी पडेल, असा विश्वास देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केला.





