Pune Porsche case : मकानदारचे आमदाराशी लागेबांधे डॉ. तावरेसाठी दलाली करत असल्याचा पोलिसांना संशय

पुणे – ससून रुग्णालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचा अधीक्षक डॉ. अजय तावरे आणि कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेला अश्पाक मकानदार हा एका आमदाराचा खास माणून असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
मकानदार हा संबंधित आमदार नगरसेवक असल्यापासून त्याच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत होता. तो मागील पाच महिन्यांपासून डॉ. अजय तावरेच्या संपर्कात होता. यामुळे संबंधित आमदारापुढील अडचणी वाढल्या आहेत. मात्र, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू असल्याने, तसेच तपासाला कोणतेही राजकीय वळण लागू नये म्हणून संबंधित आमदाराचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अश्पाक बाशा मकानदार (३६, रा. धानोरी, विश्रांतवाडी) आणि अमर संतोष गायकवाड (२७, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) यांनी रक्ताच्या नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.
त्यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी यापूर्वी डॉ. तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे, तर मुलाला वाचविणाऱ्या विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
त्यातील डॉक्टरांना सात जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अग्रवाल पती पत्नी १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. गुन्हे शाखेने मकानदारला अटक केल्यावर केलेल्या तपासात तो मागील पाच महिन्यांपासून डॉ. अजय तावरेच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे,
तसेच त्यांचे एकमेकांना सुमारे ७० फोन झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. यामुळे मकानदार हा डॉ. तावरेसाठी दलाली करत असल्याचा संशय बळावला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की आमचा तपास सध्या अग्रवाल कुटूंबाभोवतीच आहे.
मात्र, यातून अनेकांचा सहभाग व इतर धागेदोरेही बाहेर येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ससूनमधील दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मात्र, तपासात पुढे येत असलेली माहिती धक्कादायक आहे.
आम्ही अगोदर भक्कम पुरावे गोळा करत आहोत. त्यानंतरच एका एका व्यक्तीला हात घालू मकानदार याचा अपघात प्रकरणात देखील महत्त्वाचा सहभाग आहे. रक्त बदलण्याचा प्रकार डॉ. तावरे आणि मकानदार यांच्यातील चर्चेतूनच झाला आहे.
मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. ज्या दिवशी रक्ताची डीएनए तपासणी होण्यासंबंधी बातमी पसरली त्यामुळे विशाल अग्रवालवर अटकेची टांगती तलवार राहिली. यामुळे मकानदार आणि त्यांच्यातील व्यवहार लांबणीवर पडला.
दरम्यानच्या काळात विशाल अग्रवाल आणि मकानदारची एका कॅफेत भेटही झाल्याचे पुढे आले आहे. याच बैठकीत मकानदारने विशाल अग्रवाल यांना तुमच्यावर कारवाई होईल, असे सांगितले होते. त्यानंतर विशाल अग्रवाल हा संभाजीनगर येथे फरार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अग्रवालने डॉ. तावरे यांना कोणामार्फत पैसे दिले, याचा शोध घेताना मकानदार आणि गायकवाडचा सहभाग पुढे आला होता. यातील गायकवाड संबंधित आमदाराच्या भावाचे हुक्का पार्लर व इतर व्यवसाय संभाळत असल्याचेही उघड झाले आहे. मात्र, आमचा तपास सध्या फक्त अपघात प्रकरणावर केंद्रित असल्याचे पोलीस सांगत आहेत.
वसुली कोणासाठी ?
मकानदार एका आमदाराच्या सातत्याने संपर्कातही आहे. संबंधित आमदाराच्या मतदारसंघात त्याची ओळख आमदाराचा माणूस म्हणूनच आहे. दरम्यान, मकानदार अवैध धंदेवाल्यांकडूनही पैसे गोळा करत असल्याची माहिती पुढे आली आहे. हे पैसे तो कोणासाठी गोळा करत होता, याचीही माहिती पोलीस घेत आहेत.





