Pune News: ‘सीमाभागातील ८५६ गावांमध्ये लाडकी बहीण योजना राबवावी’; डॉ. किरण ठाकूर यांची CM शिंदे यांच्याकडे मागणी

पुणे – महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना यशस्वी लागू केली. याच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागातील महिला भगिनींसाठी अशीच महत्वाकांक्षी योजना लागू करावी, त्यांच्यासाठीचा मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व दैनिक तरूण भारतचे सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकूर यांनी केली आहे.
डॉ. किरण ठाकूर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी गुरूवारी (१५ ऑगस्ट) भेट घेतली. या भेटीदरम्यान सादर केलेल्या निवेदनात डॉ. ठाकूर यांनी ही मागणी केली आहे.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. त्यावरून महिलांसाठी अशा योजनांची गरज अधोरेखित झाली असून, अशा प्रकारच्या मदत सीमावर्ती भागातील महिलांनी देखील मिळणे अपेक्षित आहे.
सीमावर्ती भागातील महिला बाल कल्याणकारी योजनांवर महाराष्ट्र शासनाने अधिक लक्ष देणे गरजेचे असून या भागातील 856 हून अधिक गावांमधील मराठी भाषिक महिलांना महाराष्ट्र राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेतंर्गत ज्या प्रकारे महिला ठराविक रक्कम दिली जाते, तशी योजना सीमावर्ती भागातील महिलांसाठी राबवावी.
तसेच काही महिला लग्नापूर्वी सीमाभागातील मराठी भागात म्हणजे बेळगाव निपाणी येथे होत्या, लग्नानंतर त्या महाराष्ट्रात स्थायिक झाल्या. या संदर्भाने योजनेतील अटी-नियमांमध्ये शिथिलता असावी.
राज्य शासनाने केलेली ही मदत सीमावर्ती भागातील महिलांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मोलाची मदत ठरेल अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांना सादर केलेल्या एकीकरण समिती तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.




