Pune News : जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेचा जागतिक गौरव: ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’मध्ये टॉप 10 मध्ये स्थान

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जागतिक पातळीवरील ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज’ स्पर्धेत ‘लोकसहभागातून शाळा विकास’ विभागात पहिल्या १० शाळांमध्ये स्थान मिळवले आहे. टी ४ एज्युकेशन (T4 Education) आयोजित या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लाखो शाळांमधून ही शाळा अव्वल ठरली, ही महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे.
जागतिक दर्जाचे शिक्षण सरकारी शाळेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेत सहभागी झालेल्या जालिंदरनगर शाळेने प्रामाणिक प्रयत्नांद्वारे हे यश संपादन केले. मागील आठवड्यात टी ४ एज्युकेशनकडून प्राप्त ई-मेलद्वारे शाळेची टॉप १० मध्ये निवड झाल्याची माहिती मिळाली. दि. १८ जून रोजी सकाळी ११:३० वाजता जागतिक लाइव्ह कार्यक्रमात याची घोषणा झाली. यानिमित्ताने शाळेत विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
मुख्याध्यापक दत्तात्रय वारे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय शाळांशी तुलना करून आपली प्रगती तपासणे आणि त्यांच्या उत्कृष्ट उपक्रमांचा अवलंब करणे हा आमचा हेतू होता. हे यश सरकारी शाळांच्या क्षमतेचा पुरावा आहे.” ही कामगिरी करणारी जालिंदरनगर शाळा देशातील पहिली सरकारी शाळा आहे आणि यंदाच्या स्पर्धेत भारतातील एकमेव शाळा आहे. पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील या शाळेच्या यशाने सरकारी शिक्षण व्यवस्थेचा दृष्टिकोन बदलण्यास आणि शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवण्यास हातभार लावला आहे.
पुढील टप्प्यात टॉप १० मधून सर्वोच्च शाळेची निवड होईल. त्या शाळेला १ कोटी रुपये बक्षीस मिळेल. यासाठी पब्लिक वोटिंग आवश्यक आहे. भारतातील एकमेव सरकारी शाळा म्हणून जालिंदरनगर शाळेला देशवासीयांच्या पाठिंब्याची गरज आहे. मुख्याध्यापक वारे यांनी सांगितले, “पब्लिक वोटिंग आमच्यासाठी आव्हानात्मक आहे, पण देशवासीयांच्या सहकार्याने आम्ही हे यश मिळवू शकतो.” या यशाने सरकारी मराठी माध्यमाच्या शाळा खाजगी आणि प्रगत देशांतील शाळांशी स्पर्धा करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. जालिंदरनगर शाळेच्या या प्रवासाला सर्व स्तरांतून शुभेच्छा मिळत आहेत.





