pune news : तो खूनच, पण धागा मिळेणा… दोन वर्षापुर्वी सापडला होता पर्वतीच्या जंगलात मृतदेह

पुणे – पर्वती टेकडीवर पडक्या पाण्याच्या टाकीजवळ एका महिलेचा १७ ऑगस्ट २०२० मध्ये मृतदेह सापडला होता. त्या महिलेची ओळख आणि मृत्यूचे कारण कळले नव्हते. मात्र दोन वर्षानंतर आलेल्या वैद्यकीय अहवालानूसार तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तीच्या डोक्यात आणि छातीवर कठीण वस्तूने आघात करुन खून केल्याचे अहवालात म्हटले आहे. यानंतर पर्वती पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पर्वती टेकडीच्या वरील बाजूच्या जंगलामध्ये एका पडक्या पाण्याच्या टाकीजवळ ३० ते ४० वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. तेव्हा तीची ओळख पटली नव्हती. तसेच अंगावर काही जखमा दिसत नव्हत्या.
यामुळे अकस्मात मयत म्हणून नोंद करत तपास सुरु करण्यात आला होता. दरम्यान तीचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. वैद्यकीय अहवाल नुकताच प्राप्त झाल्यावर तीचा डोक्यावर आणि छातीवर कठीण वस्तूने आघात करुन खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
यामुळे खूनाच्या अनुषंगाने पर्वती पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याप्रकरणा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे करत आहेत. पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांनी सांगितले की, या महिलेजवळ ओळख पटेल असे काहीही सापडले नाही.
तसेच मिसिंग महिलांच्या प्रकरणाच तपास करत त्यातही ओळख पटली नाही. महिलेच्या एका हातावर सुरेखा असे नाव गोंदले गेले आहे. यामुळे कोणास काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधा.





