Pune News: चांदणी चौक ते भूगाव उड्डाणपूल निविदेत घोळ? महापालिकेकडून निविदा रद्द; फेरनिविदेचे आदेश
Pune News: ठराविक ठेकेदाराला फायद्यासाठी अटींमध्ये फेरफार केल्याचा नगरसेवक अरविंद शिंदे यांचा आरोप; आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती मागणी.

Pune News – महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून चांदणी चौक ते भूगाव या ६० मीटर रुंदीच्या रस्त्यासह उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी काढलेल्या निविदेत घोळ झाल्याचा आरोप केल्याची दखल घेत आधीची निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याविषयीचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी संबंधित विभागाला दिले आहेत.
मर्जीतील ठेकेदाराला हे काम मिळावे, यासाठी निविदेतील अटींमध्ये बदल केल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे ती निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी शिंदे यांनी आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली होती. भूगावकडून चांदणी चौकात येणाऱ्या रस्त्यावर उड्डाण पूल उभारला जाणार आहे. हे काम ठराविक ठेकेदाराला मिळावे, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय यापूर्वीच व्यक्त केला होता.
तसे पत्रही आयुक्तांना दिले होते, असे शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या कामासाठी महापालिकेच्या अंदाज समितीने तयार केलेला अंदाज (अपेक्षित खर्च) आणि निविदेमध्ये धरलेल्या खर्चात मोठी तफावत आहे. समितीने तयार केलेल्या अंदाजापेक्षा ४५ कोटी रुपये अधिक खर्च निविदेत धरल्याचा आरोप शिंदे यांनी केला. मात्र, प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च आणि निविदेतील खर्चामध्ये केवळ दीड कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
महापालिकेच्या अंदाज समितीने दिलेला अंदाज हा डिसेंबर २०२५ मध्ये दिला होता. त्यानंतर काही वस्तूंचे दर वाढले, तसेच निविदा प्रक्रिया राबवताना मान्यता दिलेला नकाशा आणि प्रत्यक्ष काम यामध्ये काळानुसार बदल करणे गरजेचे होते. त्यामुळे खर्च वाढल्याचे गोजारे यांनी स्पष्ट केले. निविदा प्रक्रियेवरील आक्षेपामुळे ही प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून, पुढील काही दिवसांत फेरनिविदा काढली जाणार असल्याचे गोजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.






