Pune News : “स्वारगेट बस स्थानकातील घटना शरमेने मान खाली घालायला लावणारी” – अजित पवार

पुणे : शहरातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षांच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याच्या घटनेने पुणे शहरासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेतील आरोपी हा जामिनीवर सुटलेला असून त्याच्या शोधसाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. दरम्यान, अश्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेवर आपली भूमिका मांडली आहे.
अजित पवार म्हणाले की, “पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही.
मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो.
पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत.” असं अजित पवार म्हणाले आहेत.





