Pune News : “तू मला पसंतच नाहीस!” लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी पत्नीचा मोठा गौप्यस्फोट; आठ महिन्यांत लग्न रद्द
Pune News : वैवाहिक संबंधांना नकार अन् घराबाहेर पाऊल; पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न केले रद्द.

Pune News – थाटामाटात लग्न झाले. त्याने वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला लग्न मान्यच नाही. तुम्ही (नवरा) पसंतच नाही. आई-वडिलांच्या दबावापोटी लग्न केल्याचे तिने लग्नानंतर तिसऱ्या दिवशी सांगितले. यामुळे त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. मानसिक धक्क्यातून सावरत त्याने न्यायालयात धाव घेतली. ७ महिने १६ दिवसांच्या संघर्षानंतर दावा निकाली निघाला.
न्यायालयाने लग्न रद्द केले. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी.कदम यांनी हा आदेश दिला.माधव (वय २७) आणि माधवी (वय२४) (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. तो व्यावसायिक, तर ती गृहिणी. पारंपारिक पध्दतीने पाहणी करून जून २०२४ मध्ये दोघांचा विवाह झाला. लग्नानंतर नवराच पसंत नसल्याचे सांगत तिने पतीला वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला.
लग्नाच्या २० दिवसानंतर माहेरी गेली. ती परतलीच नाही. पतीने अॅड.राहुल जाधव यांच्यामार्फत मे २०२५ मध्ये न्यायालयात धाव घेतली. मुलीचा विवाह आई-वडिलांच्या मर्जीनुसार झाला आहे. मुलीला मान्य नाही. त्यामुळे तो रद्द करून देण्याची मागणी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने लग्न रद्द केले.
लग्न कसे होते रद्द?
लग्नावेळी कोणते विधी झाले पाहिजेत, तसेच त्यातील कोणत्या पारंपरिक बाबी पाळल्या पाहिजेत, तसेच, कायदेशीर कोणत्या बाबीची पुर्तता केली पाहिजे. याबाबत हिंदू विवाह कायद्यात काही अटी कलम ५ मध्ये नमूद केल्या आहेत. त्या अटीचे पालन न केल्यास लग्न रद्द करण्यासाठी कलम ११ आणि १२ नुसार अर्ज करता येतो. हा अर्ज लग्न झालेल्या तारखेपासून १ वर्षाच्या आतमध्ये करावा लागतो. अर्ज आल्यानंतर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकुण न्यायालय निर्णय देत असते.
“आई-वडिलांना पाल्याला विश्वासात घेऊनच लग्न जमवावे. जेणेकरून लग्नानंतर वाद, मनस्ताप होणार नाहीत. पती-पत्नी दोघांसह कुटुबियंनाही याचा त्रास होत असतो.”
– अॅड. राहुल जाधव, खजिनदार, द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन





