Ashadhi Wari 2025 – पालखी सोहळ्यात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पालखी सोहळ्याचे आगमनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आला. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहनी करण्यात आले होते. मात्र पालखीचे आगमन शहरात होण्यापुर्वीच ठिकठिकाणी बॅरिकेडस आणि बांबू लावून रस्ते बंद करण्यात आले. यामुळे शहराच्या मध्यवर्ती परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता), डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता – फर्ग्यूसन रस्ता), गाडगीळ पुतळा चौक ते स. गो. बर्वे चौक (छत्रपती शिवाजी रस्ता), आपटे रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता (टिळक चौक ते संत कबीर चौक), शनिपार चौक ते सेवासदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक, गणेश रस्त्यावरील देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, नेहरू रस्त्यावरील रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद होते. याचा परिणाम प्रचंड वाहतूक कोंडी होण्यावर झाला होता. नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता. यातच वारीतील हजारो ट्रक आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी सकाळीच दाखल झाले होते. यामुळे गल्ली बोळातील वाहतूकीसही अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांना तत्परता दाखवता आली नाही.. पालखी सोहळा मुक्कामी आल्यानंतर नाना आणि भवानी पेठेतील रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर , शनिवार वाडा परिसरात वारकरी गर्दी करत असल्याने शुक्रवार ते रविवारी सकाळी अकरापर्यंत शिवाजी रस्ता आणि लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक ते बेलमाग चौक) वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. याचा परिणाम मात्र उलटा झाला. वाहनचालकांनी गल्ली बोळातून वाहने घालत शहरातील मध्यवर्ती भागच जाम करुन टाकला. वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेले रस्ते खुले करुन वाहनांना मार्ग करुन देणे आवश्यक होते. मात्र कर्तव्यावरील वाहतूक अधिकाऱ्यांनी कोणतीही तत्परता दाखवली नाही. यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता.