Pune News : पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टरचा भीषण अपघात

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समोर आले नाही. ही दुर्घटना घडली तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये 4 जण प्रवास करत होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
काय घडले नेमके?
मुळशी तालुक्यातील कोंढावळे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाले आहेत. हॉटेल गारवा लागत शेतात हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर गावातील लोक आणि गारवा हॉटेलचे मालक आणि कर्मचारी तातडीने मदतीसाठी धावले.
AW 139 असे अपघात झालेल्या हेलिकॉप्टरचं नाव आहे. सदर हेलिकॉप्टर जुहू मुंबई इथून हैदराबाद जात होतं. ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याचे समजत आहे. हेलिकॉप्टरचे कॅप्टन आनंद हे जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर, दिर भाटिया, अमरदीप सिंग, एस पी राम हे जखमी झाले आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.





