Pune News : पोलिसांच्या रडारवर गुटखा विक्रेते ; छुपी गुटखा विक्री थांबवण्याचे आयुक्तांचे आदेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यात गुटखा बंदी असली तरी शहरात छुपी गुटखा विक्री होत असून अनेक ठिकाणे लाल पिचकाऱ्यांनी रंगली आहेत. शहराच्या या विद्रुपीकरणाची खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दखल घेतली असून गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.नागरिकांनी पानपट्टी, किराणा दुकानात होत असलेल्या गुटखा विक्रीची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावी, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते. तसेच पानपट्टी, किराणा माल दुकानात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या आहेत.गुटखा बंदीनंतरही राज्यात परराज्यातून चोरीचा गुटखा विक्रीस येतो. उपनगरातील गोदामात गुटख्याची साठवणूक केली जाते. तेथून शहरात छोट्या दुकानात गुटखा विक्रीस येतो.
यापूर्वी पोलिसांनी महामार्गावर गुटखा तस्करी करणारी वाहने अडवून कारवाई केली आहे.गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास (डायल ११२ किंवा १००) दिली तर तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.





