पुणे – शहरातील कात्रज परिसरातील गुजरवाडी येथे असलेल्या कचरा रॅम्पला दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. कचरा असल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली. रात्री उशीरापर्यंत जवानांकडून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गुजरवाडी येथे मोकळ्या जागेत तोडलेले झाडे तसेच कचरा यांचा साठा केला जातो. या कचर्याला रविवारी दुपारी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, सुका कचरा असल्याने आगीने रोद्र रुप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असून संबंधीत ठिकाणी असलेले पोकलॅण्ड आणि अन्य साहित्य जवानांनी बाहेर काढले. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते. सुदैवाने आगीत कुठलीही जिवीतहानी नाही. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण समोर आले नाही. अग्निशमन विभागाचे गणेश भंडारे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते.