Pune News | आरक्षणावरून सरकारची ‘अशी ही बनवाबनवी’ सुरूच ; विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांवर घणाघात

प्रभात वृत्तसेवा
पुणे – अशी ही बनवाबनवी चित्रपटाप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची बनवाबनवी करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने दबावापोटी शासन निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे पुण्यात काँग्रेस भवन येथे ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, सरकार समाजाला मूर्ख बनवत असून सर्वांचे वाटोळे करत आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हिसकावून घेतले गेले असून, या गरीब समाजाला आरक्षणाचे संरक्षण राहील का, असा सूर उमटत आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी १० ऑक्टोबरला नागपूर आणि २० ऑक्टोबर रोजी संभाजीनगर येथे ओबीसी समाजाच्या मोर्चाचे आयोजन केले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही आम्ही चर्चा करत असून त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.





