Pune news : ‘एडीवाईपीयू’मध्ये भू-राजकीय व सुरक्षेच्या मुद्द्यांवर सोमवारी आंतरराष्ट्रीय परिषद !

पुणे – अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात (एडीवाईपीयू) १३ जानेवारी रोजी भू-राजकीय आणि सुरक्षेचे मुद्दे या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. परिषदेचा मुख्य उद्देश जागतिक भू-राजकीय आणि सुरक्षेच्या आव्हानांवर चर्चा घडवून आणणे असून, विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रावरील मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणे आहे.
परिषदेत ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि वॉशिंग्टन डी.सी. येथील बे अटलांटिक विद्यापीठातील प्राध्यापक प्रा. पाओलो वॉन शिराक यांचे प्रमुख व्याख्यान होणार आहे. ते इंडो-पॅसिफिकमधील भू-राजकीय रणनीती: आव्हाने आणि संधी या विषयावर विचार मांडतील.
यावेळी डॉ. निशाकांत ओझा सेंट मार्टिन बेटाचे अमेरिकेच्या भू-राजकीय हितांसाठी धोरणात्मक महत्त्व आणि भारतासाठी त्याचे परिणाम या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ही परिषद विद्यापीठाच्या डेंटल ऑडिटोरियममध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या वेळेत होणार आहे.
या उपक्रमाद्वारे जागतिक समस्यांवर संवाद साधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ निर्माण केले आहे. विचारवंत, धोरणकर्ते आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून भू-राजकीय आव्हानांवर सामूहिक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे अजिंक्य डी. वाय. डॉ. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष अजिंक्य डी. वाय. डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
या निमित्ताने एडीवाईपीयू-जीपीआय चॅप्टरचे उद्घाटन होणार आहे. जागतिक रणनीती अभ्यासासाठी सहकार्य मजबूत करण्यात महत्वाची भूमिका यातून बजावण्यात देईल. परिषदेची सुरुवात कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन यांच्या उद्घाटन भाषणाने होणार आहे. याशिवाय इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या मुद्द्यांवर पेपर सादरीकरण व मुक्त चर्चा होणार आहे.





