Pune News : समाजकार्यातून राजकारणाकडे! अविनाश लगड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – युथ फाउंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेले अविनाश लगड यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी त्यांच्या सोबत अनेक सहकाऱ्यांनीही पक्षप्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे सिंहगड रस्ता परिसरात पक्षाला आणखी बळकटी मिळणार आहे.युथ फाउंडेशन माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांसह, युवकांसाठी रोजगार, महिला, ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लगड यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे.
लगड म्हणाले की, युथ फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करताना जाणवले की, समाजकार्यास राजकारणाची जोड मिळाली तर ते कार्य अधिक प्रभावी व अचूक होते. त्यामुळेच मी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पक्षात सामावून घेत माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.
महिला आरोग्याच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह आपल्या मित्रपरिवार, लगड कुटुंब, स्नेही व सर्व समर्थकांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करीत राष्ट्रवादी काॅग्रेसच्या माध्यमातून सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले.





