Pune News | विदेशी पाहुण्यांची गणेशोत्सवाला दाद ; म्हणाले “अशी ऊर्जा कुठेच पाहिली नाही”

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुण्याच्या गणेशोत्सवाने देशासह परदेशातील नागरिकांनाही भूरळ घातली आहे. इतर वेळीप्रमाणे यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक परदेशी नागरिकांनी सहभाग घेतला. या विसर्जन मिरवणुकीतील तरुणाईचा जोष आणि उल्लास, नागरिकांची गर्दी, त्यांची उर्जा, विविध देखावे आणि एकंदरीत नियोजनाने अनेक परदेशी पाहूण्यांना भूरळ पाडली. यावर्षी दक्षिण अफ्रिका, युरोप, साउथ दक्षिण कोरिया आणि इतर अनेक देशातील पाहूण्यांनी सहभाग घेतला.
यात दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या एका ग्रेगरी जॉर्ज आणि गिनिका यांच्या कुटुंबात त्यांच्यासह त्यांचा १० वर्षीय मुलगा आणि मुलीचा देखील समावेश होता. गेल्या १० दिवसांपासून पुण्यात असलेल्या या कुटुंबाने नऊ दिवस गणेशोत्सव पाहण्यात घालवले. आतापर्यंत अनेक देशात फिरलो असून यासारखं कुठेच काही पाहिले नसल्याचे जॉर्ज यांनी म्हटले.
दक्षिण कोरियाचे मिन सू किम आणि जाए ह्यून ली यांनाही गणेशोत्सवात सहभागी तरुणाईची ऊर्जा थक्क करणारी वाटली. पुण्यातील नागरिकांनी आमचे खुल्या मनाने स्वागत केले, भरपूर प्रेम दिले, गणेशोत्सवात समावून घेतले त्यामुळे आम्ही भारावून गेलो असल्याचे दोघांनी म्हटले.





