Pune News | अडीच मिनिटांसाठी पंधरा दिवस वेठीस ; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल अखेर खुला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – काम पूर्ण झाल्यानंतरही १५ दिवसांपासून उद्घाटनाची प्रतीक्षा असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील अखेरच्या सिंहगड रस्ता उड्डाणपूलाचे अखेर सोमवारी उद्घाटन झाले. या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, अवघ्या अडीच मिनिटांत पुलाचे अनावरण केले, फित कापली अन् याच पुलावरून स्वारगेटकडे क्षणात रवाना झाले. मुख्यमंत्र्यांनी पुलाच्या उद्घाटनासाठी केवळ अडीच मिनिट दिल्याने त्यासाठी सिंहगड रस्त्यावरील लाखो नागरिकांना पंधरा दिवस विनाकारण त्रास सहन करावा लागला.
या रस्त्यावरून दिवसाला येऊन-जाऊन किमान तीन लाख वाहने प्रवास करत असतात.गेली काही वर्षे वाहतूक कोंडीने मेटाकुटीस आलेल्या सिंहगड रस्ता आणि आसपासच्या नागरिकांची काही प्रमाणात अखेर मुक्तता झाली आहे. अखेर हा पूल सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पूलामुळे नागरिकांचा २० ते २५ मिनिटांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, आमदार सुनील कांबळे, आमदार बापू पठारे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिकेकडून सप्टेंबर २०२१ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या दरम्यान सुमारे २.५ किमीचा हा पुण्यातील सर्वात लांब उड्डाणपूल आहे. या कामासाठी एकूण ११८ कोटी रुपये खर्च आला आहे. नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधीच तो पूर्ण तयार झाला. या पुलाचे काम तीन टप्प्यात करण्यात आले.
दोन टप्प्यांचे लोकार्पण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील पुलाचे कामही १३ ऑगस्ट रोजी पूर्ण झाले होते. त्यामुळे, पुणे विद्यापीठाच्या उड्डाणपुलासोबतच या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन पुढे ढकलले जात होते.त्यातच, पूल तयार असूनही सुरू केला जात नसल्याने मुख्य रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.
त्यानंतर या पूलाचे उद्घाटन करावे या मागणीसाठी राजकीय पक्षांकडूनही आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतरही पूल सुरू होत नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. अखेर सोमवारी पुण्यात गणेशमंडळांच्या भेटीसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या अडीच मिनिटांत पुलाच्या उद्घाटनाचे सोपस्कार उरकले.
पत्रकारांना मज्जाव..
कार्यक्रमासाठी पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पोलिसांनी रोखल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पत्रकारांनी महापालिका आयुक्त आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना याची कल्पना दिली. परंतु, मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच सुरक्षेच्या कारणास्तव अशी सूचना असल्याचे सांगण्यात आले.





