Pune news : फुरसुंगी, हांडेवाडीत एफडीएची धडक; ६६ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त
दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ६६ लाख ८६ हजार रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. फुरसुंगी येथे साठ्यासह वाहनही जप्त करण्यात आले.

Pune news – सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी आणि हांडेवाडी येथे धडक कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला.
दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ६६ लाख ८६ हजार रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. फुरसुंगी येथे साठ्यासह वाहनही जप्त करण्यात आले. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागातील क्षेत्र सह पथकाने २४ नोव्हेंबर रोजी फुरसुंगीतील खंडोबा माळ परिसरात छापा टाकला. विविध ब्रँडचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळले.
या कारवाईत ३५ लाख ९५ हजार ६२४ रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि पाच लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ४० लाख ९५ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात वसीम जाकीर सनदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच दिवशी हडपसरमधील हांडेवाडी परिसरात, जेएसपीएम महाविद्यालयाजवळील डग्गड चाळ, ड्रीम इस्टेटजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. येथेही प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळले.
या ठिकाणाहून २५ लाख ९० हजार ३७६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिरोज भुरे मुन्सरी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
दोन्ही कारवायांमध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. सह आयुक्त एस. आर. करकळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. प्रतिबंधित पदार्थांची साठवणूक, वाहतूक किंवा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.






