US-Iran War : ‘सात अटी मान्य होईपर्यंत अमेरिकेशी चर्चा नाही’; इराणने पुन्हा केली भूमिका स्पष्ट
इस्रायलने सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात किमान ९ पॅलेस्टिनी ठार झाले, असे गाझामधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

US-Iran War : जोपर्यंत आपल्या ७ अटी मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत युद्ध समाप्त करण्यासंदर्भात अमेरिकेशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही, असे इराणने म्हटले आहे. मात्र आपल्या सात अटींबाबत इराणने स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही.
इराणचे मुख्य वाटाघाटीकार आणि संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सात अटीबाबतची इराणची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
इराणवरील सर्व निर्बंध हटवणे, अमेरिकेने केलेली इराणच्या बंदरांची नाकेबंदी उठवणे आणि इराणच्या गोठवलेल्या मालमत्तेला खुले करण्याचा या अटींमध्ये समावेश असल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. जर शत्रूने काही चूक केली, तर इराण संघर्षाची भौगोलिक व्याप्ती बदलून टाकेल, असा इशाराही गालिबाफ यांनी दिला आहे.
होर्मुझमध्ये पाणसुरुंगांमुळे ३ टँकरचे स्फोट
होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याविषयीच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या ३ टँकरची पाणसुरुंगांना धडक झाली आणि झालेल्या स्फोटात या टँकरचे नुकसान झाल्याचेही इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या नौदल शाखेने म्हटले आहे.
अवैध मार्ग तपासण्यासाठी किंवा मागरी इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी नाही, असेही रिव्होल्युशनरी गार्डच्या नौदलाने म्हटले आहे.
अमेरिकेच्या हवाई देखरेखीखाली प्रवास करत असतानाही पाणसुरुंगांच्या धडकेनंतर झालेल्या स्फोटामुळे या तिन्ही टँकरना आग लागल्याचेही रिव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे.
गाझामध्ये इस्रायली हल्ल्यात ९ पॅलेस्टिनी ठार
इस्रायलने सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात किमान ९ पॅलेस्टिनी ठार झाले, असे गाझामधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यामध्ये हमासच्या प्रशासनातील गृह मंत्रालयातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारीही होता. मईम अबू नाहल हा अंतर्गत सुरक्षा सेवा विभागाचा महासंचालक होता.
पश्चिम गाझा सिटीमध्ये झालेल्या हल्ल्यातच तो मारला गेला. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे आणि इस्रायलकडून हमासच्या सुरक्षा दलांना यापुढेही लक्ष्य करणे सुरू ठेवले जाईल, असे म्हटले आहे.






