Pune News : जमीन हडपण्यासाठी ‘नकली महिला’ची स्कीम! वाघोलीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वाघोली : वाघोली येथील १० एकर जमिनीबाबत बनावट महिला उभी करुन ती जमिनीची मुळ मालक असल्याचे भासवून खरेदीखत तयार करणार्या चौघांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचाही सहभाग आहे.
आनंद लालासाहेब भगत (रा. वाडेगाव), शैलेश सदाशिव ठोंबरे (रा. हडपसर), चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे आणि अपर्णा यशपाल वर्मा ऊर्फ अर्चना पटेकर (रा. इस्लामपूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२२ ते १७ मे २०२३ दरम्यान घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील १० एकर जमीन हडपण्याच्या उद्देशाने संगनमत करुन हवेली सह दुय्यम निबंधक कार्यालयात अर्चना पटेकर या महिलेला अपर्णा यशपाल वर्मा असे नाव धारण करायला सांगून तीच मुळ जागा मालक आहे, हे भासविले.
अपर्णा वर्मा या नावाचे बनावट दस्त नोंदणीसाठी खोटे, बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करुन जमिनीचे खरेदीखताचे दस्त तयार केले. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली. त्यात बनावट कागदपत्रे तयार करण्यात या चौघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यांचा चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे अधिक तपास करीत आहेत.
यापूर्वीही जागा बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…
बनावट अधिकारपत्राद्वारे वाघोलीतील १० एकर जागा बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेसह तिघांवर यापूर्वीही २०२१ मध्ये लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिघांनी बनावट अधिकारपत्र नोटराईजकरून एका व्यक्तीस दिले होते. त्यावेळीही अपर्णा वर्मा व संबंधित व्यक्तीची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.





