Pune News : हवेलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या लेटर बॉम्ब मुळे खळबळ; बड्या नेत्यावर निलंबन करण्याची मागणी

वाघोली – शिरूर हवेली विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीचा आखाडा रंगतदार अवस्थेत आलेला असतानाच हवेली तालुक्यातील भाजपमधील गटबाजी उघडकीस आली असून भाजपच्या बड्या नेत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजपच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी निवेनाद्वारे केली आहे.
विधानसभेच्या तोंडावर भाजपचे किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब बबनराव सातव, हे विरोधी गटाच्या उमेदवारास मदत होईल असे कृत्य करत आहेत तसेच तालुका अध्यक्ष, विधानसभा संयोजक व विधानसभा प्रमुख यांना कोणतेही कल्पना न देता परस्पर बुथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख व भाजपा पदाधिका-यांच्या बैठका घेऊन पक्षात दुफळी होईल व पक्षविरोधी वातावरण निर्माण होईल असे कृत्य ते वेळोवेळी करत आहेत. त्याबाबत त्यांच्यासोबत वेळावेळी संवाद साधुन देखील त्यांनी हे कृत्य चालु ठेऊन पक्षाअंतर्गत दोनगट निर्माण
होईल असे वातावरण निर्माण केले आहे व अशा प्रकारच्या बातम्या वेळोवेळी वृतपत्रामध्ये छापुन आलेल्या आहेत. अशा परीस्थितीत पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यास पक्षाचे काम करण्यास अवघड जात आहे. दादासाहेब सातव हे प्रदेश पदाधिकारी असुन बेजबाबदारपणे वर्तणूक करत आहेत.
यांच्या वर्तणुकीमुळे तालुक्यात काम करणे आम्हास व आमच्या पदाधिका-यांना अवघड जात आहे. सातव यांच्यावर पक्ष शिस्तभंग निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी हवेली तालुका भाजपा अध्यक्ष शामराव परीलाल गावडे,विधानसभा प्रमुख १९८ शिरूर विधानसभा प्रदीप विद्याधर कंद, विधानसभा संयोजक १९८ शिरूर विधानसभा संदीप उत्तमराव भोंडवे यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे.





