Pune News : खोदाई केली, दुरुस्ती करणार कोण? सीसीटीव्ही प्रकल्पाने पुणेकर हैराण

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहराच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून नव्याने २,८८६ सीसीटीव्ही कॅमेरे शहरभर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी शहरातील प्रमुख टेकड्यांसह विविध भागांमध्ये सुमारे ३५० किलोमीटर खोदाई केली जाणार आहे. मात्र, या खोदाईनंतर दुरुस्ती कोण करणार, याचा निर्णय झालेला नसल्याने, खोदाई झालेल्या जागा ओबडधोबड पद्धतीने भरल्या जात आहेत. त्यामुळे पादचारी, व्यावसायिक आस्थापना, तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या खोदाईनंतर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास ३०० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिकेनेही या खर्चासाठी हात वर करत केंद्र शासनाकडे निधीची मागणी केली आहे. मात्र, दुरुस्ती कोण करणार आणि कधी करणार, याबाबत महापालिका, तसेच पोलिसांकडे कोणतेही स्पष्ट उत्तर नाही. त्यामुळे पुणेकरांना या खोदाईचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहराच्या सुरक्षेसाठी यापूर्वी सुमारे १,४०० सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात २,८८६ सीसीटीव्ही बसविण्यासाठी शहरातील विविध भागांत ३५० किलोमीटरची खोदाई करण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या काळातच या खोदाईला सुरुवात करण्यात आली होती. महापालिकेने सुरुवातीला शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये २८ किलोमीटर खोदाईस परवानगी दिली होती, तर १ ऑक्टोबरपासून संपूर्ण खोदाईसाठी परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, शहरात येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या मार्गावरील खोदाई १५ दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी एकाच वेळी खोदाई सुरू असून, केबल टाकण्याचे काम गतिमान झाले आहे. मात्र, कामानंतर खोदलेली जागा व्यवस्थित न भरल्याने रस्ते ओबडधोबड झाले आहेत. काही ठिकाणी चालणेही अवघड झाले असून, वाहनधारकांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
महापालिकेचे हात वर?
या खोदाईच्या कामासाठी काढलेल्या निविदांमध्ये खोदाईनंतरची दुरुस्ती अथवा रस्ते आणि पदपथ पूर्ववत करण्याचा खर्च समाविष्ट नाही. गृह विभागाने थेट आदेश देत ही दुरुस्ती महापालिकेने करावी, अशा सूचना दिल्या आहेत; परंतु या दुरुस्तीसाठी ३०० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने महापालिकेकडे त्यासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने केंद्र शासनाच्या संबंधित विभागास पत्र पाठवून या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली आहे. परिणामी, निधी मिळाल्यानंतरच दुरुस्तीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
ओबडधोबड दुरुस्ती..
या खोदाईचे काम शहरातील अनेक भागांत व्यावसायिक दुकानांसमोर, इमारतींलगत आणि घरांच्या समोर करण्यात आले आहे. खोदाईनंतर केबल टाकून ती जागा योग्य प्रकारे भरून सपाट करणे आवश्यक होते. मात्र, कामगारांकडून जमेल तशी माती आणि दगड भरले जात असल्याने रस्ते असमान झाले आहेत. अनेक ठिकाणी मोठे दगड आणि उंचवटे निर्माण झाले असून, नागरिकांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.



