Pune news : वाघोलीतील २५ हजार नागरिकांचा विजेचा प्रश्न मार्गी

वाघोली : वाघोली तालुका हवेली येथे सिस्का कंपनी जवळ अतिउच्च दाबाची विद्युत वाहिका कार्यान्वित करण्यासाठी वाघोलीचे देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, उपाध्यक्ष रामभाऊ दाभाडे यांनी पुढाकार घेऊन सिस्का कंपनी आणि महावितरण यांच्यात निर्माण झालेला तणाव दूर करून वाघोलीतील 25 हजार नागरिकांच्या वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी मोलाची मदत केल्याने नागरिकांकडून महावितरण व वाघोलीतील पदाधिकारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाघोली मधील विजेच्या सततच्या ये जा मुळे नागरिक त्रस्त झाले होते. विजेचा लपंडाव थांबत नव्हता. वाघोली मध्ये सिस्का कंपनीच्या आवारात असणारी पूर्वीची वीजवाहिका अतिउच्च दाबाची करण्यासाठी महावितरण कडून केबल बदलण्यासाठी प्रयत्न केले जात होते. महावितरण कडून पूर्वी विजेच्या सुरक्षिततेचे बाबतीत योग्य ती काळजी न घेतल्याने सिस्का कंपनी व महावितरण यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता.
लोकप्रतिनिधी माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन कंपनी प्रतिनिधी व महावितरण यांच्यातील वाद सामोपचाराने मिटवून वाघोलीतील विजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी योगदान दिले असल्याने वाघोलीतील बकोरी फाटा, आय व्ही इस्टेट परिसर, केसनंद फाटा परिसर या भागातील 25 हजार वीज ग्राहकांना वीज सुरळीत पुरवण्यासाठी मदत होणार असून विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी घेतलेल्या पुढाकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.
वाघोली मधील महावितरण कडून जास्तीत जास्त कामे करून नागरिकांचे विजेचे प्रश्न सोडवण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले. नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवून विजेची उपलब्धता मुबलक प्रमाणात करण्यासाठी महावितरण कडून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्य करणार असल्याचे वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी माजी सरपंच जयश्री सातव पाटील, प्रसिद्ध उद्योजक भारत सातव, स्वप्नील मगर, महावितरणचे शाखा अभियंता दीपक बाबर, महावितरण व कंपनीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





