Pune News : पुणेकरांना खड्ड्यात घालू नका! काँग्रेस शिष्टमंडळाची पालिका आयुक्तांकडे मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे : दिवाळीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने रस्ते खोदाईची कामे तातडीने थांबवावीत, अशी मागणी माजी आमदार व प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्तांकडे आज (शुक्रवारी) केली.नियोजित सायकल स्पर्धेसाठी ट्रॅक तयार करणे आणि सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी काही भागांत रस्ते खोदाई सुरू आहे. सुमारे २८ किलोमीटर रस्त्यांवर ही कामे होणार आहेत. ही कामे आवश्यक असली तरी सध्या सणासुदीच्या दिवसांत वाढत्या रहदारीमुळे कोंडी तीव्र झाली आहे.
अशा परिस्थितीत रस्ते खोदाईमुळे नागरिकांच्या अडचणी वाढतील. त्यामुळे या कामांना सण संपेपर्यंत स्थगिती द्यावी, अशी मागणी काॅग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाकडे केली. प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी व माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात सुनिल मलके, अविनाश बागवे, प्रथमेश आबनावे, मुख्तार शेख, आयुब पठाण, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, गौरव बोराडे, यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.



