केंद्रीय मंत्रिपदावरून मिश्रांना तातडीने हटवावे; कॉंग्रेस शिष्टमंडळाचे राष्ट्रपतींना साकडे

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून कॉंग्रेस पक्ष आणखी आक्रमक झाला आहे. त्यातून पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्या भेटीत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना तातडीने हटवण्याची मागणी करण्यात आली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या दोन विद्यमान न्यायाधीशांमार्फत प्रकरणाची चौकशी करण्याचे साकडेही घालण्यात आले.
कॉंग्रेस शिष्टमंडळात राहुल गांधी, प्रियंका गांधी, ए. के. अँटनी, गुलाम नबी आझाद आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश होता. त्या शिष्टमंडळाने हिंसाचार प्रकरणाची वस्तुस्थिती मांडणारे निवेदन राष्ट्रपतींना सादर केले. भेटीनंतर कॉंग्रेस नेते पत्रकारांना सामोरे गेले.
संबंधित प्रकरणात मिश्रापुत्र आशिष आरोपी आहे. त्यामुळे नि:पक्षपाती चौकशीसाठी मिश्रा यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे. त्यांना केंद्रीय मंत्रिपदावरून हटवले जात नाही, तोपर्यंत नि:पक्षपाती चौकशी होऊ शकणार नाही आणि न्यायही मिळणार नाही.
न्यायाच्या निश्चितीसाठी न्यायालयीन चौकशी आवश्यक आहे, अशी भूमिका राहुल यांनी मांडली. संबंधित प्रकरणी सरकारशी बोलण्याची ग्वाही राष्ट्रपतींनी दिल्याचा दावा प्रियंका यांनी केला.
काही दिवसांपूर्वी लखीमपूर खेरीत एका वाहनाने चिरडल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ते वाहन मिश्रापुत्र आशिषचे असल्याचे समोर आले. त्या प्रकरणावरून मोठे वादळ उठल्यानंतर आशिषला अटक करण्यात आली. आता मिश्रा यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी शेतकरी संघटनांनी आणि कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी लावून धरली आहे.





