मुंबई – सध्याच्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने तिन्ही पक्षांच्या सरकारच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे निरीक्षक एच. के. पाटील यांनी केले. यावेळी राज्यातील एकूण स्थिती, करोनाचा प्रादुर्भाव इत्यादी विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली. राज्य सरकारने सारे निर्णय तिन्ही पक्षांच्या संमतीने घ्यावेत अशी सुचनाहीं या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. कॉंग्रेस निरीक्षक एच. के. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानी ही बैठक झाली ती तासभर चालली. राज्यातील आघाडी सरकार स्थापन होऊन आज दीड वर्षांचा कालावधी लोटला असल्याने आता किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या संबंधात आढावा घेण्याची गरज आहे असे कॉंग्रेस तर्फे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. राज्यातील अदिवासींच्या व मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांसाठी पुरेसा निधी मिळणे गरजेचे आहे असे पत्र पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते त्यावरही यावेळी चर्चा झाली. कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांना पुरेसा निधी दिला जात नाही त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो आहे अशी कॉंग्रेसच्या मंत्र्यांची भावना झाली आहे ती भावनाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानी घातली असे थोरात यांनी नमूद केले. राज्यमंत्र्यांना जादा अधिकार देण्याच्या विषयावरही यावेळी चर्चा झाली असे त्यांनी सांगितले. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मलिन होत आहे. त्यातच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे अशी जाहीर सूचना केल्यानेही कॉंग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला राजकीय महत्व होते.