Pune news : वकील संरक्षण कायद्याची मागणी.! सोमवारी वकील न्यायालयीन कामकाजापासून राहणार अलिप्त

पुणे – वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी शिवाजीनगर न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयात सोमवारी (दि. ३ नोव्हेंबर) वकील कामापासून अलिप्त राहणार आहेत. राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल अॉफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने २९ ऑक्टोबर रोजी ठराव करून राज्यातील वकिलांना ३ नोव्हेंबर रोजी कामापासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी पुणे बार असोसिएसशनचे अध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड म्हणाले की, अलिकडच्या काळात वकिलांना होणारी मारहाण, होणारे हल्ले, घडणाऱ्या घटना पाहता वकील संरक्षण कायदा होणे गरजेचे आहे. त्यामुळे बार कौन्सिलच्या आवाहनुसार शहर व जिल्ह्यातील वकिलांनी एक दिवस कामकाजापासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले आहे.
कौटुंबिक न्यायालय वकील संघटनाचाही पाठींबा
कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेली द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशननेही बार कौन्सिलच्या ठरावाला पाठिंबा दिला आहे. कौटुंबिक न्यायालयात वकिलांनी एक दिवस कामकाजापासून अलिप्त राहण्याचे आवाहान अध्यक्ष अॅड. कल्पना निकम यांनी केले आहे.





