Pune News : ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सरासरीपेक्षा ११० टक्के अधिक पाऊस झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केल्याने हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुसऱ्या पुराव्याची गरजच नाही. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी सरकार बाकीच्या गोष्टी करत आहे. केंद्राने बिहारला मदत केली, पंजाबला मदत केली. महाराष्ट्राबाबत निर्णय टाळाटाळ होत आहे.
अजून महाराष्ट्र किती उद्ध्वस्त होण्याची वाट बघत आहात? असा प्रश्न शेट्टी यांनी विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माझी एवढीच विनंती आहे की, महाराष्ट्राला गृहित धरू नका, महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.सरकारानेच पावसामुळे १८ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे जाहीर केले होते. आता ते २४ लाख हेक्टरवर गेले असून, अजूनही पाऊस सुरू असल्यामुळे हे नुकसान ३५ लाख हेक्टरवर जावू शकते.
त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज काढले आहे त्यांचे कर्ज तात्काळ माफ करावे. तसेच, ज्यांनी कर्ज न घेता खासगी सावकार किंवा इतर मार्गाने पैसा उचलला आहे, त्यांना बँक किती कर्ज देऊ शकते तेवढी रक्कम नुकसानभरपाई स्वरूपात द्यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्कही माफ करावे,’ अशी मागणीही शेट्टी यांनी केली.





