Pune News | श्री गणनायक रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक शनिवारी (दि.६) यावर्षी श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी हा रथ साकारला आहे.
सलग तिसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी चार वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. यंदाची प्रतिकृती असलेल्या केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय शैलीतील रथाची निर्मीती करण्यात आली आहे.
दक्षिण भारतात जसा लाकडाचा रथ साकारला जातो, तसा हा रथ तयार करण्यात आला आहे. रथावर ज्याप्रमाणे सप्तरंगांची उधळण केली जाते, तशीच येथेही करण्यात आली आहे. श्री पद्मनाभ स्वामी हे श्री विष्णूंचे मंदिर असल्यामुळे रथावर चार गरुडमूर्ती लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन मूर्ती सहा फूट उंचीच्या तर दोन मूर्ती तीन फूट उंचीच्या आहेत.
रथाचा आकार १६ बाय १६ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर झुंबरे, एलईडी आणि पार लाइटचे फोकस लावण्यात येणार आहेत. मिरवणुकीत मानवसेवा रथ आणि त्यामध्ये सनई-चौघडा अग्रभागी असणार आहे. मिरवणुकीत स्वरूपवर्धिनीचे पथक, केरळचे चेंदा मेलम पथक, असा लवाजमा असेल, असे रासने यांनी सांगितले.





