ध्येयवेडे लोक इतिहास घडवतात अन शिकलेले तो वाचतात – लक्ष्मणराव देवकर

विश्रांतवाडी : विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळ खेळताना हरण्याची भीती बाळगू नये.खेळाडू म्हणून पुन्हा जिंकण्याची तयारी तिथून करावी. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य नक्की बदलेल. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडे लोकच इतिहास घडवतात. शिकलेले लोक तो इतिहास वाचतात,असे प्रतिपादन एस.एस.स्कुलचे अध्यक्ष लक्ष्मणराव देवकर यांनी केले. तसेच देवकर यांनी उपस्थित सर्वांना रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रतिकनगरमधील मोहनवाडी येथील एस. एस. इंग्लिश मीडियम स्कूलचा रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देवकर बोलत होते. याप्रसंगी चार्टर्ड अकाउंटंट आर. आर. पाटील, शाळेचे अध्यक्ष लक्ष्मणराव देवकर,सचिव संदीप देवकर, शाळेच्या मुख्याध्यापिका नंदीता भादुरी, प्रसिदा रविशंकर, शिक्षक-पालक संघाचे सदस्य, स्कुलमधील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाल्यानंतर ‘मार्च पास्ट’ करण्यात आले.
स्कुलमधील चारही हाऊसच्या ध्वजवाहकांच्या प्रतिज्ञेनंतर विद्यार्थ्यांच्या खेळातील विविध स्पर्धांनां सुरुवात झाली. यामध्ये कोन बॅलन्सिंग, फुटबॉल रेस, बाईक रायडिंग, रॅकेट बॉल बॅलेंसिंग, संगीत खुर्ची, लगोरी कलेक्शन, कांगारू जम्प, पझल गेम यांसारख्या वैविध्यपूर्ण खेळांबरोबर खानदेशी नृत्य कवायत, डंबल ड्रिल अशा विविध कवायतींचाही समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या लेझीम प्रदर्शनाने सर्वांची मने जिंकली. क्रीडा महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे मल्लखांब. मल्लखांब व रोप मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच सध्याच्या युगात कराटेचे महत्व विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.आभार प्रदर्शन झाल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव संदीप देवकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मन व बुद्धी यांचा समन्वय साधला पाहिजे. त्यासाठी दररोज व्यायामाबरोबरच मैदानी खेळ खेळायला हवे. आजकाल मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थी मैदानावर खेळायला जात नसल्याने त्यांना विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना विविध खेळांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करावे. तसेच स्वसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण अवश्य द्यावे,असे संस्थेचे सचिव संदीप देवकर म्हणाले.





