Pune News : महापालिकेकडून निरूपयोगी वस्तूंचे संकलन

तीन दिवसांत तब्बल २५ टन कचरा जमा
पुणे – दसरा, दिवाळी आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर घरगुती कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत निरुपयोगी वस्तू संकलनाचे महाअभियान राबविण्यात आले. तीन दिवसांच्या या उपक्रमात तब्बल २५ टनांहून अधिक विविध प्रकारचा कचरा जमा करण्यात आला.
सणासुदीच्या काळात घरातील जुने फर्निचर, गाद्या, उशा तसेच देवीदेवतांचे फोटो, ई-कचरा आणि प्लास्टिक वस्तू यांचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढतो. हा कचरा रस्त्यावर पडू न देता, त्याचे योग्य पुनर्वापरासाठी संकलन करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. ही मोहीम १०, ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभागांमध्ये घेण्यात आली. या उपक्रमात जनवाणी, कमिन्स इंडिया फाउंडेशन, के.पी.आय.टी. टेक्नॉलॉजी, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटीव्ह तसेच श्यामला देसाई यांनी सहभाग घेतला.
तीन दिवसांत एकूण ४९१८ किलो चिंध्या, १५४७ किलो उशा, १०६३६ किलो गाद्या, ४७९३ फर्निचर वस्तू, ५९२ देवी-देवतांचे फोटो, ४३४७ किलो ई-कचरा, ११८३ किलो प्लास्टिक कचरा आणि ३१६९ किलो इतर वस्तू जमा करण्यात आल्या. संकलित कचरा अधिकृत रिसायकलर्सकडे सुपूर्त करण्यात आला असून त्यावर पुनर्वापर संकल्पनेनुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
कोथरूड मध्ये सर्वाधिक संकलन
या मोहिमेत कोथरूडमधील तब्बल २,८५७ नागरिकांनी साहित्य जमा केले. त्यात, १७ टी.व्ही., २७ लॅपटॉप, ११ ओव्हन, ८७ मोबाइल संच, १८ किलो चार्जर, ६४ पेन ड्राईव्ह, १३ संगणक, ९ प्रिंटर, ५०० कि.ग्रॅ. जुने कपडे, २,६०० कि.ग्रॅ. प्लॅस्टिकच्या विविध वस्तू, १६ हेल्मेट, दोन वॉशिंग मशीन, एक फ्रिज अशा टाकावू वस्तूंचा समावेश होता. हे साहित्य आणून देणाऱ्या नागरिकांचा यावेळी गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, उपायुक्त संतोष वारुळे आणि महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली. प्रभाग क्रमांक १०, ११, १२ या तीनही प्रभागांमध्ये एकूण ४५ ठिकाणी ई-कचरा आणि प्लॅस्टिक संकलन केंद्र उभारण्यात आली होती.





