पुणे – महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेल्या मनसे कार्यकर्ते आणि महापालिका आयुक्तांमध्ये मंगळवारी राडा झाला. यावेळी निवेदन देण्यासाठी आलेले कार्यकर्ते आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे महापालिकेत एकच धावपळ उडाली. या घटनेनंतर आयुक्तांनी थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली, तर आयुक्तांना भेटण्यासाठी आलेले मनसे कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलनास बसले. जवळपास दोन तास हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी महापालिकेत येऊन महापालिका आयुक्तांची भेट घेतली. काय घडला प्रकार… महापालिका आयुक्त मंगळवारी दुपारी महापालिकेच्या शहर स्वच्छतेची बैठक घेत होते. यावेळी मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे हे महापालिका आयुक्त बंगल्यात गायब झालेल्या सामानाच्या प्रकरणी निवेदन देण्यासाठी आयुक्त कार्यालयात आले. मात्र, बैठक सुरू असल्याने त्यांनी भेट नाकारली. त्यामुळे शिंदे यांच्यासह संतापलेल्या कार्यकर्त्यांनी बैठक सुरू असलेल्या हॉलमध्ये प्रवेश करत, “आयुक्तांना बैठकीसाठी आम्ही थांबायचे का?” असा जाब विचारला. त्यानंतर आयुक्तांनी “तुमचे निवेदन द्या, मग बघू” असे सुनावले. त्यानंतर आयुक्त आणि किशोर शिंदे यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यवसन काही वेळात एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात झाले. यावेळी आयुक्तांनी “आम्हाला गुंड म्हणाले असून, तुला बघून घेतो, घरात घुसून मारतो” अशी धमकी दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला. तर शिंदे आणि त्यांच्या सोबत आलेले कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी नाही, तर मारण्याच्या उद्देशाने आल्याचा आरोप महापालिका आयुक्त राम यांनी केला आहे. काय म्हणाले किशोर शिंदे या घटनेबाबत किशोर शिंदे म्हणाले की, “आयुक्तांच्या बंगल्यात गेल्या सामानाबाबत निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र, त्यांनी बैठकीत असल्याचे सांगत भेटण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आत गेलो. त्यावेळी आयुक्तांनी आम्हाला थेट ‘मराठी गुंड’ म्हणाले. ते आमच्याशी हिंदीत बोलत होते. त्यामुळे आम्ही त्यांना ‘मराठीत बोला’ म्हणालो असता, ते म्हणाले ‘तुम्ही मराठी गुंड आहात, तुम्हाला घरात घुसून मारेल’ अशी धमकी दिली. त्यामुळे आम्ही त्याला विरोध केला असता, ते अधिकाऱ्यांसह आमच्या अंगावर धावून आले. मी माजी नगरसेवक आहे, आमदारकी लढलो आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आलो असताना त्यांनी आम्हाला अशी वागणूक दिली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.” काय म्हणाले आयुक्त या घटनेबाबत बोलताना आयुक्त म्हणाले की, “आमची बैठक सुरू होती. यावेळी हे मनसेचे पदाधिकारी अचानक आत मध्ये आले. त्यांनी थेट मला धमकावयाला सुरुवात केली. ‘मराठीत बोला, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर पाठवेल’ असा दम देण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी त्यांना ‘तुमची समस्या सांगा’ असे विचारत असताना, त्यांच्या सोबत आलेले कार्यकर्ते थेट माझ्या अंगावर अधिकाऱ्यांसमोर धावून आले. त्यांची वर्तणूक गुंडासारखी होती. ते निवेदन देण्याच्या उद्देशाने नव्हते, तर मला नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने आले होते. त्यामुळे मी त्यांना गुंडच म्हणालो. अशा लोकांमुळेच मराठी संस्कृती बदनाम होत आहे. मी अधिकारी आहे, लोकांना बांधील आहे. त्यामुळे मी सगळ्यांना भेटतो. पण ही सरळ सरळ गुंडगिरी आहे. त्यामुळे मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली असून, मी गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे.” मनसेचे ठिय्या आंदोलन या घटनेनंतर मनसेचे निवेदन देण्यासाठी आलेले कार्यकर्ते आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसले. त्यानंतर काही वेळातच आयुक्तांच्या दालनाबाहेर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे महापालिकेकडून सगळी प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. यावेळी काही कार्यकर्ते चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. या घटनेवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. तर महापालिकेने दरवाजे बंद केल्याने अनेक कर्मचारीही महापालिकेत अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता.