Pune News : बाणेरमध्ये ‘बाऊन्सर राज’! ७०-८० जणांच्या बळावर कुटुंबे बेघर
या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.

Pune News : शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बाणेर परिसरात ‘मसल पॉवर’चा धक्कादायक नमुना समोर आला आहे. न्यायालयात जमीन वाद प्रलंबित असतानाच तब्बल ७० ते ८० बाऊन्सर्स, कामगार आणि जेसीबीच्या मदतीने तीन कुटुंबांना घराबाहेर हाकलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे बाणेर-पाषाण लिंक रोड परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तक्रारदार कृष्णा बबन खवळे यांनी पोलिस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी तसेच अभिषेक, अभिजीत आणि शिवराज केदारी यांची नावे नमूद केली आहेत. ९ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपी मोठ्या संख्येने बाऊन्सर्स आणि कामगारांसह जागेवर दाखल झाले. त्यांनी घरात घुसून शिवीगाळ, मारहाण करत काही भाग पाडला आणि कुटुंबीयांना जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आरोप आहे.
खवळे कुटुंब गेल्या २० ते २५ वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असल्याचा दावा करत असून, या कारवाईमुळे महिला, लहान मुले आणि आजारी वृद्धांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. “न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आमचे घर पाडणे हा सरळ अन्याय आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया कृष्णा खवळे यांनी दिली.
घटनेनंतर बाणेर पोलिसांकडे तक्रार देऊनही एफआयआर नोंदविण्याऐवजी केवळ एनसी करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “न्यायासाठी आम्ही भटकत आहोत, मात्र आमची कोणीही दखल घेत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. बाणेरमधील या प्रकारामुळे शहरातील वाढत्या ‘लँड ग्रॅब’ प्रकरणांबाबत चिंता व्यक्त होत असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






