Maval Tourism: लोणावळा-मावळ पुन्हा हाऊसफुल्ल! गडकिल्ल्यांवर अभूतपूर्व गर्दी; महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Maval Tourism: अतिवृष्टीनंतर लागू केलेली पर्यटनबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मागे; पवनमावळ, पवना धरण आणि कासारसाई परिसरात पर्यटकांची मोठी लगबग.

Maval Tourism – अतिवृष्टीमुळे आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तालुक्यातील पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेली पर्यटनबंदी प्रशासनाने मागे घेतल्यानंतर पवनमावळात पर्यटकांचा अक्षरशः महापूर उसळला. कलम १६३ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होताच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो पर्यटकांनी मावळकडे धाव घेतली. गेल्या काही आठवड्यांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता.
अनेक धबधबे दुथडी भरून वाहत होते. पवना, आंद्रा, कासारसाईसह विविध धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली होती. अनेक ठिकाणी पाण्याचा वेग धोकादायक बनल्याने आणि काही दुर्दैवी घटना घडल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी लागू केली होती. या काळात हजारो पर्यटकांना निराश होऊन परतावे लागले होते. मात्र हवामानात सुधारणा होताच आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पर्यटनप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली.
शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे पहाटेपासूनच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि कामशेत, वडगाव, लोणावळा या मार्गांवर वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू झाली. सकाळी आठ वाजेपर्यंतच अनेक पर्यटनस्थळांच्या पार्किंग जागा भरून गेल्या. त्यानंतर वाहनांना रस्त्याच्या कडेला उभे करण्याची वेळ आली. काही ठिकाणी पार्किंग मिळविण्यासाठीही पर्यटकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.
ऐतिहासिक पर्यटनस्थळांनाही याचा मोठा फायदा झाला. लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग किल्ल्यांकडे ट्रेकर्सची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या युवक-युवतींचे गट या किल्ल्यांकडे रवाना झाले होते. धुक्यात हरवलेले गड, हिरवागार परिसर आणि ढगांमध्ये लपंडाव खेळणारी शिखरे पाहून पर्यटक भारावून गेले. अनेकांनी गडांवरून दिसणारे विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले. तसेच कार्ला आणि भाजे लेणी येथेही पर्यटकांची मोठी वर्दळ होती.
इतिहास आणि निसर्ग यांचा संगम अनुभवण्यासाठी राज्यभरातून आलेल्या पर्यटकांनी लेण्यांना भेट दिली. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट आणि इतर व्ह्यू पॉईंटवर दिवसभर पर्यटकांची लगबग सुरू होती. धुक्याने भरलेले दऱ्याखोरे आणि कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असल्याचे चित्र दिसत होते.
प्रमुख पर्यटनस्थळांवर पोलिसांचा पहारा
पर्यटनबंदी हटविण्यात आली असली तरी प्रशासनाने सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. पवना धरण परिसरासह सर्व प्रमुख पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. धोकादायक कडे, खोल दऱ्या आणि धबधब्यांच्या परिसरात बॅरिकेड्स उभारण्यात आले असून सतर्कता फलक लावण्यात आले आहेत. धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणे, धोकादायक स्टंट करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रमुख पर्यटनस्थळांवर स्वतंत्र पोलीस पथके तैनात करण्यात आली.






