पुणे – शहरातील अंमली पदार्थांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ ४ हद्दीत पोलिसांनी विशेष मोहिम राबवून अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणार्यांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत ५३ जणांची अंगझडती, घरझडती व वाहन तपासणी करण्यात आली. त्यातून सहा आरोपींवर चार गुन्हे दाखल करून ८८ हजार ६६० रुपये किंमतीचा एकूण ४ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून सुरू करण्यात आली. परिमंडळ ४ चे पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार ३६ पोलीस अधिकारी व १३३ पोलीस अमलदारांच्या पथकाने ही मोहीम हाती घेतली. अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) प्रांजली सोनवणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (खडकी विभाग) विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पोलिसांनी स्पष्ट केले की, “शहरातील अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे राबवल्या जातील. अवैध धंद्यावर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.