Pune News : समुपदेशनामुळे अपघात भरपाईचा दावा १४ महिन्यात निकाली

पुणे : समुपदेशनाचा फायदा न्यायव्यवस्थेत होत आहे. न्याय व्यवस्थेवरील ताण तर कमी होतच आहे. दावा लवकर संपत असल्याने पक्षकारांना जलद न्याय मिळत आहे. मध्यस्थीने यशस्वी समुपदेशन केल्यामुळे मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचा दावा १४ महिन्यात निकाली निघाला आहे.
अपघात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना १ कोटी ४० लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. ही रक्कम मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या प्रकरणात अॅड. अतुल गुंजाळ यांनी मध्यस्थी करत यशस्वी समुपदेशन केले. अर्जदारांतर्फे अॅ. भिमशा शंकर पुजारी व अॅड, उर्मिला डी. जाधव यांनी काम पाहिले. तर विमा कंपनीच्या वतीने अॅड. सुरेंद्र दातार आणि अधिकारी अजिंक्य कुलकर्णी, श्रध्दा बनसोडे यांनी काम पाहिले.
पराग विजय कुलकर्णी असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. १० जानेवारी २०२३ रोजी ते बुलेट गाडीवरून चालले होते. त्यावेळी समोरून वेगात आलेल्या ट्रकने बुलटला धडक दिली. या अपघातात पराग यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे ट्रक चालकावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे.
या प्रकरणी ट्रक मालक व विमा कंपनी असलेल्या टाटा ए आय जी जनरल इन्शुरन्स कंपनी लि. च्या विरोधात पराग यांची पत्नी स्नेहल, मुलगी रितिषा, वडील विजय (रा. कोंढवा) यांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. पराग एका नामांकित कंपनीत कामाला होते. त्यांना दरमहा ७५ हजार रुपये पगार होता.
पगार आणि अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार करून दीड कोटी रुपये भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली होती. हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश जे.जी.डोरले यांच्या न्यायालयात सुरू होते. तेथून मध्यस्थीसाठी अॅड. अतुल गुंजाळ यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यानंतर अर्जदार आणि विमा कंपनीमध्ये यशस्वी तडजोड झाली.




