PUNE : पालिकेच्या कारभाराचा अजब नमुना

सिंहगडरस्ता –वडगाव बुद्रुक येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांची पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे गैरसोय होत असतानाच महापालिकेने लाखो रुपये खर्च करून खासगी जागेत पदपथ बांधल्याने सदर ठिकाणी पत्रे लावण्यात आल्यामुळे पदपथही नाही आणि पार्किंसाठी जागही नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, महापालिकेने खासगी जागेत पदपथ बांधण्यासाठी खर्च केलेला लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याने महापालिकेच्या कारभाराचा अजब नमुना समोर आला आहे.
याबाबत शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश पोपळे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून सदर प्रकरणी चौकशी मागणी करीत नागरिकांची पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी केली असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
वडगाव स्मशानभूमी शेजारी वाहतूक पोलीस चौकीमागे मनपातर्फे पादचारी मार्गावरून नागरिक अंत्यविधीसाठी जाऊ शकत होते. या ठिकाणी नागरिक वाहने पार्क करीत असत. मुळातच खासगी जागेत पदपथ बांधण्यात आलाच कसा तसेच स्मशानभुमीसाठी पार्कींग व्यवस्था कशी करणार? असा सवाल महेश पोकळे यांनी केला आहे.
वडगाव बुद्रुक येथील स्मशानभूमीत येणाऱ्या नागरीकांची पार्किंगसाठी जागा नसल्याची वस्तुस्थिती आहे. परंतु, सदर जागा खासगी मालकाची असून याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. पार्कींगचा प्रश्न चर्चेतून लवकरच सुटेल, अशी आम्हालाही आशा आहे.
– संजीव ओहोळ, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय




