पुणे : बैठकीला जात नाही; जागाही सोडत नाही अजित पवारांनी लगावला टोला

धनकवडी –पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखांसाठी ग्राहकांच्या सोयीनुसार सोयीस्कर जागा गरजेची आहे. बॅंकेच्या शाखांसाठी चांगल्या जागा उपलब्ध व्हाव्यात, अशी सूचना जिल्हा बॅंकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांना करताना उपमुख्यमंत्री, मंत्री असलो तरी बॅंकेची हौस सुटत नाही. यामुळे लोकांना शंका येते. बॅंकेच्या बैठकीला जात नाही, पण जागाही सोडत नाही, असाही टोलाही बॅंकेच्या संचालकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
जिल्हा बॅंकेच्या बालाजीनगर शाखेचे स्थलांतर शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन येथे करण्यात आले आहे. त्यावेळी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी प्रास्ताविकात बॅंकेच्या प्रगतीचा आढावा सांगितला. यावेळी उपाध्यक्ष सुनील चांदोरे, संचालक रमेश थोरात, प्रशांत जगताप, विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, किशोर धनकवडे, अश्विनी भागवत, रणजित शिवतरे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, विशाल तांबे यांनी चांगले बहुउद्देशीय सभागृह उभे केले असून बॅंकेला जागा उपलब्ध करून दिली आहे. चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीककर्ज दिले जाणार असून बॅंकेचा ढोबळ नफा 282 कोटी रुपयांवरून 350 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे पवार यांनी सांगितले.
धनकवडीतील पराभवाचे शल्य अजूनही….
खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या 2019 मधील पराभवाचे शल्य अजूनही अजित पवार यांना असल्याचे धनकवडीतील कार्यक्रमात दिसून आले. यावेळी बोलताना खडकवासलाची जागा ही आपल्यातील काहींच्या चुकांमुळे थोड्या मताने गमवावी लागली. ही जागा असती तर सहकाऱ्यांची संख्या वाढली असती आणि काम करायला आणखी ऊर्जा मिळाली असती. स्वपक्षीयाचे कान टोचत पुढील वेळी आमची गंमत केली तर तुमची गंमत करायला भाग पाडू नका, असा इशाराही पवार यांनी दिला.





