Pune News – देशातील एलपीजी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पुण्यातील पिरंगुट येथे डायमिथाइल एथर (डीएमई) या पर्यायी इंधनाचे उत्पादन पुढील दहा दिवसांत सुरू होणार आहे. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित डीएमईमुळे देशाचे एलपीजीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक आशिष लेले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या वेळी डॉ. थिरूमलाईस्वामी राजा, एत्रियम इनोव्हेशन्सचे राजेश दाते आणि टेक्सॉल इंजिनिअरिंगचे के. पी. विजयकुमार उपस्थित होते. लेले म्हणाले की, डीएमई उत्पादनासाठी एनसीएलचे संशोधक डॉ. थिरूमलाईस्वामी राजा सुमारे २२ वर्षे संशोधन करत होते. २०१९ मध्ये त्यांनी नवीन उत्प्रेरक विकसित करण्यात यश मिळवले. पुढील संशोधनातून त्याची कार्यक्षमता वाढवली. एत्रियम इनोव्हेशन्स या खासगी भागीदाराच्या मदतीने आता त्याचे उत्पादन सुरू होत आहे. हा डीएमई सुपरगॅस कंपनीला विकला जाणार असून, ती कंपनी पुढे एलपीजीसोबत मिश्रण करून ग्राहकांना विकणार आहे. पिरंगुटच्या प्रकल्पात सुरुवातीला दररोज सुमारे २५० किलो डीएमई तयार होणार असून, पुढील टप्प्यात उत्पादन क्षमता २.५ टन प्रतिदिनपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. भारतातील एकूण एलपीजी वापरापैकी ६० ते ६५ टक्के आयात केली जाते आणि त्यातील ९० टक्के आयात होर्मुझच्या आखातातून होते. तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. उत्पादन अजून कमी असल्यामुळे या प्रकल्पाचा लगेच फायदा होणार नसला, तरी भविष्यात आयात कमी करण्यासाठी तो महत्त्वाचा ठरू शकतो. डीएमई म्हणजे काय? मिथेनॉलमधील पाणी उत्प्रेरकाच्या साहाय्याने काढून डायमिथाइल एथर (डीएमई) तयार केले जाते. हे वायू स्वरूपातील इंधन असून, त्याचे अनेक गुणधर्म एलपीजीसारखेच आहेत. संशोधनानुसार एलपीजीमध्ये सुमारे ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिसळल्यास ऊर्जा किंवा वापरात फरक पडत नाही. २० टक्के मिश्रणासाठी सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधील गॅसकिट बदलावे लागते. १०० टक्के डीएमई असलेले सिलिंडरही घरगुती वापरासाठी वापरता येऊ शकतात.