Pune News | राज्यातील ७ लाख विद्यार्थ्यांचे आधार अवैध ; अपडेटसाठी दिली अंतिम तारीख

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अपडेशनचे ९३.५३ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. आधार नोंदणीच्या पडताळणीत ७ लाख २९ हजार ७६२ विद्यार्थ्यांच्या माहितीत विसंगती आढळून आल्याने त्यांचे आधार अवैध ठरविण्यात आले आहे. तसेच, ५ लाख २७ हजार ३०१ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार नोंदणीच केली नसल्याची बाब उघड झालेली आहे.
विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्रांना एकूण ८१६ आधार नोंदणी संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत उपलब्ध करून कामकाज सुरू करण्यात आले होते. राज्यामध्ये अद्याप अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आले. सरल प्रणालीमध्ये आधार नोंदीमध्ये त्रुटी असल्यामुळे मिसमॅच होत आहेत. राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
त्यापैकी नादुरुस्त संच वगळता उर्वरित कार्यरत संचाचा उपयोग करून आधार विषयक सर्व प्रलंबित कामकाज होणे आवश्यक आहे.भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (युआयडीएआय) सहकार्याने विद्यार्थ्यांची आधारची पडताळणी केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहितीमध्ये विसंगती आढळून आल्याने संबंधित आधार अवैध ठरविण्यात येऊ लागली आहे.
काही आधार नोंदणीची पडताळणीही प्रलंबितच पडलेली आहे. कामकाज पूर्ण करण्यासाठी शाळांना आता ३० सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आलेली आहे. शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. आधारबाबतची कार्यवाही प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागाकडील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
संचमान्यता आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्येच्या आधारावर होणार असल्यामुळे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील आधार नसलेल्या विद्यार्थ्यांच्या आधारबाबतची कार्यवाही त्वरित पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी दररोज तालुक्यात कार्यरत आधार नोंदणी संच ऑपरेटर यांचेकडून शाळांकडील आधार नोंदणी व अपडेशन यांचा आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार संबंधित ऑपरेटर यांचेकडून सर्व कामकाज पूर्ण करून घ्यावे लागणार आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.
आधार नोंदणी तपशील..
-एकूण विद्यार्थी संख्या – २०५१५६७९
-आधार नोंदणी – १९९८८३७८
-आधार पडताळणी – १९१८७९४३
-बायोमेट्रिक अपडेट पेंडींग (५ ते १५ वर्ष वयोगट) – ३८८८५९७
-बायोमेट्रिक अपडेट पेंडींग (१५ वर्ष पेक्षा जास्त वय) – २३५७११६०




