Pune News : ६० वर्षे जुन्या पुलाची होणार दुरुस्ती ; खडकवासला पुलासाठी महापालिका करणार खर्च

प्रभात वृत्तसेवा
पुणे – खडकवासला धरणाच्या समोरील बाजूस असलेल्या तब्बल ६० वर्षे जुन्या उड्डाणपुलाची अखेर दुरुस्ती होणार आहे. या कामासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून, त्यासाठीच्या निविदा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहेत. कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महापालिकेने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यानंतर हा पूल असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी या पुलावरील जड वाहतूक बंद केली आहे.
त्यामुळे महापालिकेकडून आता या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटक या पुलावर पाणी पाहण्यासाठी गर्दी करतात. तसेच, त्यांच्या वाहनांची पुलावर पार्किंग केली जाते. त्यामुळे पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेकडून हे काम हाती घेण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यात पावसाळ्यात जुने पूल कोसळण्याच्या घटना घडल्या असून, त्यात अनेकांचा जीव गेला आहे. मागील वर्षी कुंडमळा परिसरातही जुना पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळांवरील तसेच शहरातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. या तपासणीत, हा पूल पाटबंधारे विभागाच्या हद्दीत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने पानशेत धरण फुटल्यानंतर १९६५ मध्ये तो बांधला होता.
मात्र, सध्या ही हद्द महापालिकेची असल्याने पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना महापालिकेस देण्यात आल्या होत्या. त्यामुळे महापालिकेकडून या पुलाची दुरुस्ती पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले.
पावसाळ्यात सर्वाधिक वापर..
खडकवासला धरणापासून ते पानशेत धरणापर्यंत मुठा नदीला जोडणारा हा एकमेव पूल आहे. त्यामुळे पावसाळ्यात तसेच वर्षभर खडकवासलाकडून वारजे, शिवणे, कुडजे तसेच पानशेतकडे जाणाऱ्या वाहनचालकांकडून या पुलाचा वापर केला जातो. पावसाळ्यात या परिसरात चार महिने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. मात्र, हा पूल दोन लेनचा असल्याने वाहनचालक पुलावर गाड्या उभ्या करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच दिवाळी आणि नवरात्रीच्या काळात या परिसरात आसपासच्या गावांतील नागरिक कपडे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या पुलाची दुरुस्ती अत्यावश्यक आहे.





