पुणे – महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे मागासवर्गीय कल्याण निधीचा पूर्ण खर्च केला जात नाही. या योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळत नाही. त्या बाबत अनेक तक्रारी देखील प्राप्त होत आहेत. आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी मागासवर्गीय कल्याण निधीचा योग्य वापर करण्यात यावा तसेच मगासवर्गीयांसाठी नवीन योजनांचा समावेश करावा अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक आयोजित करण्यासाठी डॉ. धेंडे यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, समाज विकास विभागाच्या उपायुक्त रंजना गगे यांच्यासह या विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. डॉ. धेंडे म्हणाले की, गेल्या पाच वर्षामध्ये मागासवर्गीय कल्याण योजनेंतर्गत एका रुपयाच्या निधीची देखील वाढ झालेली नाही. महापालिकेचा समाज विकास विभाग निधी मधील संपूर्ण रक्कम पुर्ण खर्च करत नाही. विभागाकडील उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. अधिकारी व कर्मचारी हा निधी खर्च करण्यात उदासीन असल्याचे दिसते. अधिकाऱ्यांच्मु उदासीनतेमुळे गरजू लोकांपर्यंत योजना पोहचत नाही. मागासवर्गीय कल्याण मधील निधी खर्च करताना अनेक अटी शर्ती या बेकायदेशिर व किचकट पद्धतीने समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बदल करायची गरज असल्याचे डॉ. धेंडे यांनी सुचविले. तसेच अनेक नविन योजनांचा समावेश करायला पाहिजे. तसेच प्रत्येक महिन्याला आढावा घेऊन त्याबाबत पुढील कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.