Nagar | जयघोषात बुऱ्हाणनगरच्या श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिरात घटस्थापना

नगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात गुरवारी सकाळी नवरात्रौत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची महापूजा, अभिषेक करून दुपारी १२ वाजता आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदोउदो…, तुळजाभवानी माताकी जय… या जयघोषात भक्तिपूर्ण वातावरणात विविधीत घटस्थापना झाली.
यावेळी मंदिराचे पुजारी भगत कुटुंबियांच्या सुवासिनींनी फेटे परिधान करत डोक्यावर सजवलेले घट घेवून मंदिराला वाजतगाजत प्रदक्षिणा मारली. यावेळी भगत परिवाराच्या सदस्यांनी भगवे ध्वज, अबकारी घेत तुळजाभवानी देवीचा जयजयकार करत होते.
या प्रदक्षिणे नंतर मंदिराचे मुख्य पुजारी अॅड.विजय भगत, दुर्गा भगत, अॅड.अभिषेक भगत व कुणाल भगत यांनी मंदिरात विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती केली. नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी मढण्यात आली होती.
तसेच फुलांच्या माळांनी देवीचे रूप अधिकच प्रसन्न वाटत होते. मंदिर गाभाऱ्यातही विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनास भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.
घाटांच्या प्रदक्षिणेच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या निंबोडी शाखेच्या लहान मुलींनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिके सदर करून उपस्थितांची मने जिंकली.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरातही सजावट करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिना असल्याने भाविकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आले आहेत.
तसेच देवीच्या मुखदर्शनाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी वेगळी रांग असणार आहे. भाविकांना २१ तास देवीचे दर्शन करता येणार आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त पुढील १० दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी अॅड.अभिषेक भगत यांनी दिली आहे.
यावेळी राजेंद्र भगत, अंजली भगत, किरण भगत, मनीषा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, कविता भगत, ऋषिकेश भगत, अॅड.अजिंक्य भगत, वैभवी भगत, अंकिता भगत, अॅड.संकेत भगत, अक्षदा भगत, दिप्तेश राऊत व वेद भगत आदींसह सुवेंद्र गांधी उपस्थित होते.




