Pune: अंबामाता मंदिरात नवरात्रोत्सव; ट्रस्टची ३१ वर्षांपासून परंपरा

कात्रज – सुखसागरनगरमधील अंबामाता मंदिरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ट्रस्टच्या वतीने यावर्षी जय्यत तयारी करण्यात आली असून स्व. धनराज राठी यांनी १९९३मध्ये अंबामाता मंदिर ट्रस्टची स्थापना केली.
ट्रस्टने गेल्या ३१ वर्षांपासून परंपरा, पूजा-आरती नित्यनेमाने चालू ठेवली आहे. नवरात्र उत्सवाची सुरूवात गुरुवारी (दि. ३) उद्योजक रविंद्र राठी व त्यांच्या पत्नी प्रिती यांच्या हस्ते घटस्थापना व पूजा-अभिषेक करुन करण्यात आली.
मंदिरामध्ये सकाळी, सायंकाळी आरती करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी संपूर्ण मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. सकाळी शुभ मुहूर्तावर हवन करुन त्यानंतर १०१ कन्यांचे कन्यापूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर हलवा पुरी प्रसादाचे वाटप होईल.
तसेच दसऱ्याच्या दिवशी सप्त धान्यांच्या खिचडीच्या प्रसादाचे वाटप होणार आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री अंबामाता मंदिर ट्रस्टच्या कामकाजाकरिता ट्रस्टी मगराज राठी, रविंद्र राठी, राजेश राठी, चुन्नीलाल राठी यांच्यासह राठी समूह, स्वयंसेवक व पोलीसांचे सहकार्य लाभत आहे.
संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्वयंसेवक व सुरक्षारक्षकांची मोठ्या संख्येने नेमणूक केलेली आहे. सर्व नियमांचे पालन करून केवळ महिलांसाठी दांडियाचे आयोजन, दररोज भजन-किर्तन आदी उपक्रम दररोज घेण्यात येत आहेत. सर्व कार्यक्रम भक्तिभावाने शिस्तबद्ध नियोजन पद्धती व शांतीपूर्वक साजरे करण्यात येत असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांकडून देण्यात आली आहे.





