Sharankumar Limbale: “हा सामाजिक न्यायाच्या लढाईचा सन्मान आहे”- शरणकुमार लिंबाळे
Sharankumar Limbale:

संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याने मसापमध्ये सत्कार
Sharankumar Limbale: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी माझी निवड सामाजिक न्यायाच्या लढाईचा, सामान्य माणसाच्या जगण्यातील संघर्षाचा आणि त्याच्या जगण्याच्या ऊर्मीचा सन्मान आहे, असे प्रतिपादन शरणकुमार लिंबाळे यांनी केले.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्या परिषदेत आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे, पुरुषोत्तम सप्रे, प्रदीप निफाडकर, देवीदास फुलारी, स्वाती महाळंक, पी. डी. पाटील, गुरय्या स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
लिंबाळे म्हणाले, की दलित साहित्याची चर्चा व्हावी, त्याचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा आणि त्याला पुरस्कार मिळावेत, यासाठी संघर्ष करावा लागला. दलित साहित्य लिहिताना मनात भीती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारही असायचे. दलित साहित्य म्हणजे प्रस्थापित समाजाशी साधलेला संवाद आहे. संवादाशिवाय लोकशाही, समता आणि बंधुता शक्य नाही.
पुरोगामी चळवळीतील जातीय पूर्वग्रहामुळे परिवर्तनवादी चळवळीची पीछेहाट होत आहे. वैचारिक मतभेदातही व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. सामाजिक चळवळींमध्येही विचारस्वातंत्र्यावर बंधने आणण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची टीका त्यांनी केली.
साहित्य परिषदेतील वाद शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने बाजूला ठेवावेत, साहित्य संस्थांना आर्थिक बळ द्यावे आणि महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा व साहित्य संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सरस्वती सन्मानामुळे आंबेडकरी चळवळीतील लोकांनी केलेल्या टीकेचे उत्तरही त्यांनी या वेळी दिले. दलित साहित्याची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्याची संधी म्हणून पुरस्कार स्वीकारल्याचे ते म्हणाले.
लिंबाळेंकडे समाजाविषयी संवेदनशीलता, तळमळ आणि आस्था असून, चळवळीत काम करण्याची अस्वस्थताही आहे. शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्याबरोबरच पुढील शंभर वर्षांसाठी मराठी भाषेची दिशा आणि प्रवास निश्चित करणारे हे संमेलन असेल, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला.
लिंबाळे हे स्वतःची ठाम भूमिका असलेले आणि ती स्पष्टपणे मांडणारे साहित्यिक आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीला सर्वांचे सहकार्य मिळाले, असे सोमण यांनी सांगितले.





