TET Exam: टीईटी परीक्षा तळ्यात- मळ्यात
TET Exam:

आता नव्या वर्षात परीक्षेला मुहूर्त मिळण्याची शक्यता
TET Exam: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. आता नवीन वर्षात जानेवारी किंवा फेब्रुवारीत टीईटी परीक्षा होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे दोन लाखाहून अधिक उमेदवारांनी जून २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
मात्र, परीक्षेच्या एक दिवसआधी टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे परीक्षा परिषदेला २८ जून रोजीची टीईटी परीक्षा रद्द करावी लागली. त्यानंतर अधिवेशनात यावरून बराच गदारोळ झाला. शासनाने टीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयही जाहीर केला आहे.
पेपरफुटीला सुमारे सहा महिन्यांचा कालावधी होत आला, तरीही अद्याप टीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाखो शिक्षक टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.
परीक्षा परिषदेतर्फे वेळोवेळी शासनाकडे टीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला जातो. नुकताच पुन्हा एकदा परीक्षा परिषदेने शासनाकडे टीईटी परीक्षेबाबत पत्रव्यवहार केला आहे. परीक्षा आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, याबाबत चाचणी करण्यात आली.
वेगवेगळ्या भाषांमध्ये टीईटी परीक्षा घेणे अडचणीचे ठरत आहे. मात्र, त्यावर मार्ग काढून लवकरात लवकर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत परीक्षा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत.





