पुणे जिल्हा | राज्य सरकारने कोणाचीही मागणी नसताना पुणे- नाशिक

बेल्हे, (वार्ताहर) – राज्य सरकारने कोणाचीही मागणी नसताना पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग बनविण्याचा घाट घातला आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा पर्यायी रस्ता असून नव्याने औद्योगिक महामार्ग अनावश्यक आहे.
त्यात पिकाऊ, बागायत क्षेत्रातून जात असून या महामार्गाला शेतकर्यांचा कडाडून विरोध असून शासनाने महामार्गाला तात्पुरती स्थगिती दिलेले आहे
परंतु येत्या आठ दिवसांत महामार्ग कायमस्वरूपी रद्द केल्याचे शासनाने परिपत्रक काढावे. अन्यथा बाधित शेतकर्यांच्या वतीने मंत्रालयावरती प्रचंड मोर्चा तसेच सर्व संबंधित मंत्री व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केले जाईल. असा इशारा महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांनी व्यक्त केले.
काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) या ठिकाणी पुणे- नाशिक महामार्गामुळे बाधित शेतकर्यांचा विरोध हा शासन दरबारापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकर्यांशी संवाद साधण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त काठापूर बुद्रुक या ठिकाणी बाधित शेतकर्यांची बैठक पार पडली. या बैठकीला औद्योगिक महामार्गात जमीन जाणारे बाधित शेतकरी उपस्थित होते.
यावेळी माजी उपसरपंच विशाल करंडे, कान्हु करंडे, संतोष करंडे, नवनाथ करंडे, पंढरीनाथ करंडे, धनंजय करंडे, फकीर करंडे, शिवाजी करंडे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काठापूर बुद्रुक हे गाव पूर्णपणे 100 टक्के बागायती आहे; परंतु या गावच्या सातबारा उतारावर हंगामी बागायतीचा शेरा आहे. त्याचप्रमाणे शासनाचा रेडी रेकनरचा दर हा अत्यल्प आहे. त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीत बागायती जमीन ही महामार्गासाठी जाऊ देणार नाही. असा इशारा यावेळी शेतकर्यांनी दिला.
2013 च्या कायद्यानुसार बागायती जमीन कोणत्याही महामार्गासाठी घेऊ नये. अशा सूचना असतानाही शासनाने चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून काठापूर बुद्रुक गावातील क्षेत्र या महामार्गासाठी घेतले आहे.
त्यामुळे या रस्त्याला काठापूर बुद्रुक मधील बाधीत शेतकर्यांचा तीव्र विरोध आहे. हा मार्ग कुठूनही न्यावा परंतु काठापुर मधुन हा मार्ग नेऊ देणार नाही. शासनाने या महामार्ग अधिसूचना काढून रद्द करावा. अन्यथा येणार्या कालखंडामध्ये सर्वच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हट्टाग्र आंदोलन करण्यात येणार आहे.
राजकीय नेते आणि कंत्राटदार यांची अभद्र युती मलईदार प्रकल्प जनतेवर लादून प्रचंड भ्रष्टाचाराची सोय करत आहे. लोकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन सदर प्रस्तावित महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी 21 सप्टेंबर पासून काठापूर येथे या पट्ट्यातील बाधित शेतकर्यांचे उपोषण करण्यात येणार आहे.-कानू करंडे, बाधित शेतकरी
प्रसंगी प्राणांतिक उपोषण
हा प्रश्न 19/9/2024 पर्यंत निकाली काढावा; अन्यथा प्रांनांतीक उपोषण, रस्ता रोको, सर्व शासकीय कार्यालय आणि मंत्री, आमदार, खासदार यांच्या कार्यालय व घरापुढे धरणे उपोषण, कोणत्याही राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी व प्रसंगी मतदान बहिष्कार अश्या पद्धतीने आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील सरपंच किशोर घोडे,
मा. उपसरपंच नजीरभाई चौगुले, प्रतिक जावळे, गणपत गाडगे (मा ग्रा. सदस्य), सुनील जावळे सर (सदस्य ग्रा. प. निमगाव सावा) दादामिया पटेल (अध्यक्ष मुस्लीम जमात) अशोक गाडगे, अमोल जावळे, रिजवान पटेल, अनिस पठाण, सागर बोर्हाडे, शुभाष जावळे, व इतर बाधित शेतकर्यांनी दिली.





